ब्रम्होत्सवासाठी बालाजी मंदिरासह व्यंकटगिरी सजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:36 AM2017-11-23T00:36:26+5:302017-11-23T00:44:41+5:30
बुलडाणा : येथील व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी भक्तांसाठी श्रद्धा उत्सव म्हणून ओळखला जाणार्या ब्रम्होत्सवाला २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी भक्तांसाठी श्रद्धा उत्सव म्हणून ओळखला जाणार्या ब्रम्होत्सवाला २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंदिराची सजावट, रोषणाई, यज्ञकुंड तसेच कीर्तनासाठी भव्य शामियाना, यासह विविध तयारी पूर्णत्वास आली असून, संकल्प छपन्नभोग पूजा व प्रसादाने या उत्सवाची सायंकाळी गोविंदाच्या गजरात सुरुवात झाली.
उत्सवात २३ नोव्हेंबर रोजी शिवराज महाराज शास्त्री यांचे आरंभ कीर्तन होणार असून, २५ नोव्हेंबर रोजी संत तुकोबारायांचे वंशज गुरू कान्होबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. शनिवारी सकाळी यज्ञयाग पूजेनंतर १0८ कलशांचे आवाहन व षोडशोपचार पूजा होईल. बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक सकाळी आणि दु पारी महाकुंभ अभिषेक, चक्रस्नान तसेच आरती होईल. सकाळी काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. या दिवशी दुपारी महाप्रसादाचे आयोजन, तर विशेष पूजा २३ नोव्हेंबर रोजी गणपती व महालक्ष्मीचा नव कलशाभिषेक, २४ नोव्हेंबर वराह स्वामी व पद्मावती नव कलशाभिषेक, सायंकाळी ७ वाजता श्रीदेवी, भूदेवी सोबत श्री बालाजींचा विशेष कल्याणोत्सव अर्थात विवाह सोहळा होणार आहे.