कृषी कार्यालयात तोडफोड, १० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:34+5:302021-09-04T04:41:34+5:30
उटी येथील शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रार अर्जाचे काय झाले याची विचारणा करायला ...
उटी येथील शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रार अर्जाचे काय झाले याची विचारणा करायला गेले हाेते़. यावेळी त्यांना तालुका कृषी अधिकारी व संबंधित कृषी सहायक मिळून आढळले नाहीत. संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड केल्याची घटना २ सप्टेंबर रोजी घडली हाेती़. उटी येथील शेतकऱ्यांची फळबाग योजनेतील कृती आराखड्यात नावे असून फळबाग अनुदानासाठी कृषी सहायक यांनी काही शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये घेऊन कोणत्याच प्रकारचे काम केले नाही. याची लेखी तक्रार २४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी देऊनही कृषी विभागाने कृषी सहायक यांची कोणतीच चौकशी केली नाही. यावर उटी येथील काही शेतकरी मेहकर येथील तालुका कृषी अधिकारी यांना भेटायला गेले असता त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी भेटले नाहीत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्कसुद्धा झाला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरळ आपला राग कृषी अधिकारी कार्यालयावर व्यक्त करीत तेथील खुर्च्या, टेबल, काच फोडल्या. यात अंदाजे २० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी सहायक अधीक्षक पुरुषोत्तम भगवान लोणकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय सुळकर, विष्णू आंधळे, देवानंद धोटे, मनोहर काठोळे, गोपाल चांदणे, प्रकाश लाड, अमोल धोटे, शे. शिराद शे. दादामिया, शे.राजू शे.रज्जाक, देवानंद सुळकर सर्व रा.उटी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये हे करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्येवर आवाज उठवल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही दिलेल्या तक्रारीची चौकशी होऊन संबंधित कृषी सहायकावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. ज्याची संपूर्ण जबाबदारी ही कृषी विभागवार राहील.
संजय सुळकर, शेतकरी, उटी.