वानखेड येथील यात्रेत भाविकांची मांदियाळी!
By admin | Published: January 25, 2016 02:19 AM2016-01-25T02:19:10+5:302016-01-25T02:19:10+5:30
वानखेड येथील जगदंबादेवीची यात्रा उत्साहात, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
अमोल ठाकरे/वासुदेव दामधर / संग्रामपूर(जि. बुलडाणा): तालुक्यातील वानखेड येथील श्री जगदंबादेवी यात्रेच्या दुसर्या दिवशी दहीहंडी व महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. येथे दरवर्षी यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दहीहंडी व महाप्रसादाची संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून दुपारी १२ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होऊन सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावर्षी प्रथमच महाप्रसादासाठी ४५ क्विंटल उडिदाचे वरण व ज्वारीच्या भाकरीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वानखेड येथील युवा स्वराज्य मंडळ, जय मातादी मंडळ, जय मल्हार मित्रमंडळ, जय भवानी मित्रमंडळ तसेच दुर्गादैत्य व परिसरातील गावांमधील अनेक स्वयंसेवी मंडळांनी भाग घेऊन महाप्रसाद वितरणासाठी सहकार्य केले. यावर्षी प्रथमच मोठे आकाशपाळणे, मौत का कुंआमधील कसरती, विविध खेळणी, प्रसादाची दुकाने दुकानदार, व्यापार्यांनी या यात्रेत लावली होती. यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी तामगाव पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच या यात्रोत्सवाकरिता परिसरातील ४0 पोलीस मित्र बंदोबस्ताकरिता तैनात होते.