बहुरंगी लढत रंजक ठरणार
By admin | Published: October 6, 2014 11:59 PM2014-10-06T23:59:17+5:302014-10-06T23:59:17+5:30
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही बहुरंगी लढत रंगणार.
अर्जुन आंधळे / देऊळगांवराजा (बुलडाणा)
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विना होत आहे. १९९५ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकल्या नंतर यावेळी आ.शिंगणे निवडणूक आखाडयात नाहीत. यावेळी पंचरंगी नव्हे तर थेट षटरंगी लढत होत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या पक्षाचे प्रमुख सहा उमेदवार दंड थोपटून आहेत. जातीय समिकरणाचा विचार करता मराठा समाजाचे दोन, वंजारी समाजाचे तीन, माळी समाजाचा एक असे उमदेवार नशीब अजमावित आहेत. कधी नव्हे एवढा गोंधळ यावेळी निर्माण झालाय. प्रचाराचे आठ दिवस संपले तरीही चित्र स्पष्ट होत नाही.
यामुळेच नेमका कोणत्या दोन उमदेवारात सामना होईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. मराठा आणि वंजारी या प्रमुख असलेल्या दोन समाजांच्या मताची विभागणी अटळ असल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मतांची शिदोरी ज्या उमेदवाराच्या पारडयात पडेल तोच उमेदवार यावेळी सिंदखेडराजाचा आमदार होणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रेखाताई खेडेकर यांची संपूर्ण मदार डॉ.राजेंद्र शिंगणेवर आहे. दुसरे शिवसेनेचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर तिसर्यांदा नशीब अजमावत आहेत.
वंजारी समाजाचे तीन उमेदवार असून भाजपाचे डॉ.गणेश मान्टे, काँग्रेसचे प्रदिप नागरे, मनसेचे विनोद वाघ या तिघांची प्रचार यंत्रणा आघाडीवर आहे. डॉ.गणेश मान्टे यांची संपूर्ण मदार भाजपाची परंरागत मते, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मतदारांवर असून पंकजा मुंडे यांच्या सभेनंतर चित्र बदलून डॉ.मान्टे यांना मोठी ताकद मिळू शकते.
काँग्रेसचे प्रदिप नागरे युवा असून मुकुल वासनिकांनी यावेळी नवीन चेहर्याला संधी दिली आहे. जशी गत राष्ट्रवादीची तीच अवस्था काँग्रेसची आहे. मनसेचे विनोद वाघ दुसर्यांदा रिंगणात आहेत. स्वत:च्या बळावर त्यांची ताकद आहे. जीवाभावाचा कार्यकर्ता, आंदोलने, मोर्चे, संघर्ष यातून ते चर्चेत आहेत. शिस् तबध्द प्रचार यंत्रणा, मतदारांशी घरापर्यंत संपर्क यावर त्यांचा भर आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर विनोद वाघ यांच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना किती बळ मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे.