वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:24+5:302021-06-17T04:24:24+5:30
चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली ...
चिखली : यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. तथापि तसे अंदाजही वर्तविले जात होते. मात्र, अवकाळी वगळता चिखली तालुक्याला अद्यापही मृग नक्षत्रातील दमदार व सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सुमारे ९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. सोबतच पावसाबाबत सकारात्मक संकेत नसल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
तालुक्यात २९ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सार्वत्रिक पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यातच मान्सून आठ दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री आकाशात चांदणे दिसते. अचानक पावसाचे वातावरण तयार होते. मात्र पाऊस पडत नाही.
मृग नक्षत्रात तालुक्यात पावसाची संततधार अपेक्षित होती. मात्र पडणारा पाऊसही विखरून पडत आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला. तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. यातील ६९ हजार हेक्टर सोयाबीन खालील क्षेत्र आहे. यासह ११ हजार ५०० हेक्टर तूर, ३ हजार ८०० हेक्टरवर उडीद, २ हजार ४०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने मशागत करून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. बियाणे, खतांची जुळवाजुळव केली. मात्र पावसाने सध्या डोळे वटारलेले आहेत.
तालुक्यातील काही मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सुमारे २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. पेरणीचे हे क्षेत्र एकूण लागवड क्षेत्रापैकी कमी प्रमाणात असले तरी आता ऐनवेळी पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे.
--१९ मिमी पावसाची नोंद--
तालुक्यात सरासरी ७८६ मिमी पाऊस पडतो. मात्र १६ जून पर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पडलेला पाऊस हा विखुरलेल्या स्वरुपात पडला. सद्यस्थितीत अमडापूर, हातणी-मालगणी, शेलगाव जहाँगीर या भागात समाधानकारक पाऊस पडला आहे.
पेरणीची अति घाई नकोच !
कृषी विभागाच्या या जनजागृतीने अनेक शेतकऱ्यांनी सबुरी राखली आहे. मात्र, तालुक्यातील काही मंडळात पुरेसा पाऊस होताच पेरण्या उरकण्याची घाई करण्यात आली आहे. यातील काही भागातील शेतकऱ्यांना तुरळक प्रमाणात १६ जून रोजी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात संततधार पाऊस गरजेचा आहे. अपुरा ओलावा व पेरणीनंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
(अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली)