मलकापूर नगराध्यक्षांच्या पत्नीचा आगळा वेगळा उपक्रम; वटपुजेऐवजी केली वडाची लागवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:13 PM2018-06-27T18:13:15+5:302018-06-27T18:15:47+5:30
मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला.
- हनुमान जगताप
मलकापूर : हिंदु धर्मातील सौभाग्यवतीसाठी अतिशय भाग्याची अशी वटसावित्री पौर्णिमा मानली जाते. यादिवशी सर्वत्र सुहासीनी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पुजा करतात. मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला.
मराठी भाषिकात वटपौर्णिमेचा दिवस सौभाग्यवतींसाठी काही औरच असतो. यादिवशी सुवासिनी वडाच्या झाडाला वेगळ्या वेगळ्या मागण्यांची साद घालीत त्यांच्या कुंकवाच्या दिर्घायुष्यासाठी साकडे घालीत असतात. त्याचबरोबर सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वटपुजन करी असतात असे सांगितल्या जाते. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात वाटचाल करीत असताना पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचा संदेश अधोरेखीत करीत असताना नगराध्यक्षांच्या पत्नी सौ.वंदना रावळ यांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. आज बुधवारी दुपारी त्यांनी शास्त्रीनगर परिसरात वटवृक्षाची लागवड केली नुसती लागवड करून न थांबता त्यांच्या वाढीची व संगोपनाचीही जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
दरम्यान या उपक्रमाविषयी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना वंदना रावळ यांनी सांगितले की, वृक्षकटाईमुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. मात्र देशाचे नागरीक म्हणून प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच आज वटपौर्णिमेदिनी वटपुजेऐवजी वडाच्या झाडाचे रोपण आम्ही केले. वंदना रावळ यांनी राबविलेला उपक्रम महिलांसाठीच नव्हे तर समाजासाठी आदर्श ठरावा असाच आहे.