'व्हीसीए'चे आता १३ वर्षाखालील मुलांसाठीही क्रिकेट सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:36 PM2018-09-29T15:36:07+5:302018-09-29T15:36:36+5:30
बुलडाणा: विदर्भ क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या धर्तीवर विदर्भात गुणवान क्रिकेटपटू शोधण्याच्या दृष्टीने चालू सत्रापासून १३ वर्षाखालील खेळाडूंचे आंतरजिल्हास्तरावर सामने आयोजित करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
बुलडाणा: विदर्भ क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या धर्तीवर विदर्भात गुणवान क्रिकेटपटू शोधण्याच्या दृष्टीने चालू सत्रापासून १३ वर्षाखालील खेळाडूंचे आंतरजिल्हास्तरावर सामने आयोजित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. व्हीसीएच्या इमर्जींग कार्यक्रमातंर्गत या स्वरुपाच्या स्पर्र्धांना आता प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत नागपूरस्तरावर एक संघ आणि विदर्भातील अन्य जिल्हे मिळून निवडचाचणीद्वारे दोन संघ निवडून अशा संघामध्ये १३ वर्षाखालील मुलांचे सामने होऊन त्यातून गुणवान खेळाडू शोधल्या जात होते. मात्र चालू सत्रापासून यामध्ये व्हीसीएने बदल केला असून नागपूर वगळता आता प्रत्येक जिल्ह्याचा १३ वर्षाखालील खेळाडूंचा एक संघ तयार करण्यात येऊन या संघामध्ये ५० षटकांचे मर्यादीत सामने खेळविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरून क्रिकेटची नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू यातून शोधण्याचा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा यामागे मानस आहे. त्यानुषंगानेच बुलडाणा येथील सहकार विद्यामंदिरावर ३० सप्टेंबर रोजी १३ वर्षाखालील मुलांची जिल्हा निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी व्हीसीएचे दोन निवड प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याने या चाचणीस महत्त्व आले असल्याचे बुलडाण्याचे प्रशिक्षक राजू ढाले यांनी सांगितले. निवड चाचणीसाठी जिल्हा क्रिकेट समितीचे संयोजक मो. साबीर, इम्रानखान, राहूल जाधव, धिरज वाकोडे, चंद्रकांत साळूंके आणि राजू ढाले प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आॅक्टोबर महिन्याच्या मध्यावर विदर्भातील नागपूर वगळता अन्य जिल्ह्यातून निवड चाचणीद्वारे निवडण्यात आलेल्या संघामध्ये सामने घेण्यात येणार आहे. सा सामन्यांमधून कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करून विदर्भाचे १३ वर्षाखालील मुलांचे दोन संघ निवडण्यात येऊन नागपूर येथील क्रिकेट क्लब आणि हे दोन्ही संघ यांच्यामध्ये व्हीसीएद्वारे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून १४ वर्षाखालील गुणवान मुलांचा संघ निवडण्यास मदत होणार असून विदर्भातील गुणवान क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या माध्यमातून मदत होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या सत्रापासून व्हीसीएने १३ वर्षाखालील मुलांचे जिल्हानिहाय संघ बनवून ५० षटकांचे मर्यादीत सामने खेळविण्यात येणार आहे. यातून कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करून विदर्भाचे दोन संघ बनविण्यात येणार आहे. नागपूर येथील क्लब आणि या संघांमध्ये सामने आयोजित करून त्यातून १४ वर्षाखालील गुणवान खेळाडू निवडून व्हीसीएच्या इमर्जींग कार्यक्रमातंर्गत या मुलांना क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण दिल्या जाईल.
- मो. साबीर, जिल्हा क्रिकेट समिती संयोजक, बुलडाणा