भाजीपाल्याची वाढ खुंटली!
By admin | Published: September 21, 2016 02:23 AM2016-09-21T02:23:59+5:302016-09-21T02:23:59+5:30
भाजी पालावर्गीय पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव.
बुलडाणा, दि. २0 - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय पावसानंतर दाट धुके पडत आहे. त्याचबरोबर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने भाजी पालावर्गीय पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम जाणवत आहे. तर काही ठिकाणी भाजीपाला पिवळा पडत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. या ढगाळ वा तावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश सेंषण क्रियेअभावी भाजीपाल्याची वाढ खुंटली आहे. परिणामी, हिरव्या भाज्यांमधील अन्नघटकांचे प्रमाण कमी होत आहे. सकाळी पडणारे दाट धुके व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने रोगट हवामानाची बाधा तूर, कापूस या पिकांसह भाज्या व इतर पिकांनाही होत आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या पिकांना कमी पावसाचा फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही, पण जसजशी िपकांची वाढ होते तसतशी प्रखर सूर्यप्रकाश आणि अनुकूल हवामानाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक असते. तरच अन्नघटकांनी परिपूर्ण पालेभाज्या फळभाज्या पिकांची वाढ होते. मात्र सध्या ढगाळ वातावरणाने पालेभाज्यांना सुर्यप्रकाशाचे दर्शन होत नसल्याने भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलाने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढविली आहे. ही परिस्थिती पुढील महिनाभर कायम राहिली तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.