युवकांमध्ये रुजविले जातेय भाजीपाला उत्पादनाचे तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:42 PM2018-09-09T16:42:47+5:302018-09-09T16:44:00+5:30
बुलडाणा: संरक्षीत भाजीपाला लागवड कशी करायची व उत्पादन वाढीचे तंत्र युवकांना अवगत व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्यावतीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे
बुलडाणा: संरक्षीत भाजीपाला लागवड कशी करायची व उत्पादन वाढीचे तंत्र युवकांना अवगत व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्यावतीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजीपाला लागवडीच्या विविध पैलूंवर ग्रामीण भागातील शेतकरी युवकांना धडे दिले जात आहेत.
शासनाच्या कृषि आणि शेतकरी कल्याण या विभागांतर्गत कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रम योजनेतून येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. येथील कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहामध्ये संरक्षीत भाजीपाला लागवड या विषयावर ग्रामीण शेतकरी युवकांकारिता कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रम ३ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमावर मार्गदर्शन केले. शेतकºयांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संरक्षीत भाजीपाला लागवडीकडे वळण्याचे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सी. पी. जायभाये यांनी संरक्षीत भाजीपाला लागवडीचे महत्व पटवून देताना हरित गृहातील खत, तन व पाणि व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला पिकांच्या लागवडीची सद्यस्थिती, व्याप्ती आणि महत्व संरक्षीत संरचना, संरक्षीत फळेवर्गीय आणि वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, हरितगृहातील कीड व रोग तसेच तण, पाणि आणि खत व्यवस्थापण संरक्षित भाजीपाला लागवड संबंधित कृषि विभागाच्या विविध योजना या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी शेतकºयांना देण्यात येत आहे.
शास्त्रज्ञांचे मिळते मार्गदर्शन
ग्रामीण शेतकरी युवकांकारिता कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्याच दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. श्याम घावडे यांनी भाजीपाला लागवडीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक जायभाये, आत्माचे उप प्रकल्प संचाल जयंत गायकवाड, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. अनिल तारू, राहुल चव्हाण, डॉ. जगदीश वाडकर, डॉ. गणेश काळूसे, डॉ. स्नेहलता भागवत, डॉ. भारती तिजारे कुंतल सातकर आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.
कॅप्शन- प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाईक व अन्य.