बुलडाणा शहरात गर्दीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:14 PM2020-04-14T12:14:17+5:302020-04-14T12:14:23+5:30
‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढल्याने प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी शहरातील गर्दी होणाऱ्या ठिकाणची भाजीपाला विक्री बंद करण्यात आली आहे. मर्यादीत ठिकाणीच भाजीपाला विक्री सुरू ठेवण्यात आली असून या ठिकाणी देखील गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांची करडी नजर असल्याचे दिसून येत आहे. ‘कोरोना’ ला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
बुलडाण्यात पहिला ‘कोरोना’ पॉझीटीव्ह रुग्ण इकबाल चौक परिसरात आढळून आला. यामुळे हा संपूर्ण परिसर तेव्हापासून सील करण्यात आला आहे. याच परिसरात भाजीपाल्याचा बाजार असल्याने बाजार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजीपाला विक्रीसाठी शहरातील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली. यामध्ये शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान, लहाने लेऊटमधील मैदान, बाजार समिती परिसर व डॉ. लद्धड हॉस्पीटलच्या मागील मैदानाचा समावेश होता. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १५ वर पोहचल्याने विशेष खबरदारी म्हणून या सर्व ठिकाणची भाजीपाला विक्री बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येथे गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. आता मर्यादीत ठिकाणीच भाजीपाला विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. या दुकानांवरदेखील पोलिस प्रशासनाची करडी नजर आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकान बंद करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
सलून, पानटपऱ्यांसमोर भाजीपाल्याची दुकाने
सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ लागू आहे. यामुळे सलून व पानटपºया धारकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगाराचे पर्यायी साधन म्हणून अनेकांनी चक्क सलून तथा पानटपरीसमोरच भाजीपाल्याचे दुकान थाटल्याचे दिसून येत आहे.