भाजीपाला विक्रेते आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:37+5:302021-03-01T04:39:37+5:30
धाड : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी दुपारी ते साेमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. ...
धाड : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी दुपारी ते साेमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. भाजीपाला विक्रेत्यांनाही दुकाने लावण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे भाजीपाला विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात सध्या काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाऊन केले आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांना बसला आहे. दररोज शेतातून निघणाऱ्या भाजीपाल्याची विक्री होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर दैनंदिन भाजीपाला विकून व्यवसाय करणाऱ्यांना भाजीपाला या संचारबंदीमध्ये मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. धाड परिसरात भाजीपाल्याचे उत्पादन हे तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात होते आणि त्याची विक्री मोठमोठ्या शहरात करण्यात येते. परंतु, जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केल्यानंतर आता विक्रीकरिता तयार असलेल्या भाजीपाला पिकांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मोठ्या मेहनतीने व मोठा खर्च करून भाजीपाला शेती करण्यात येते. यासाठी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून खर्च लावतात. परंतु, सध्याच्या कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत भागातील असंख्य शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल झाला आहे. या परिसरात मिरची, कोबी, पालक, मेथी, गवार, भेंडी, कोथिंबीर याची सर्वाधिक प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यांना या भाजीपाला पिकांमधून दररोज लाखो रुपये मिळतात. परंतु, प्रशासनाने सलग तीन दिवस जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु केले आहे आणि आगामी काळात ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशास्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला जर विकला गेला नाही तर त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला तोंड देण्याची वेळ येणार आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.