भाजीपाला महागला, कांद्याचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:12+5:302021-01-18T04:31:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलोवर स्थिर आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही चार ते पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.
बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा ५० रुपयांवर कायम आहे तर हिरवी मिरची ६० रुपये किलाे, वांगे ४० रुपये किलोवर पाेहोचले आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने जवळपास दुप्पटीने दर वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर वाढल्याचे चित्र आहे. साेयाबीन तेल पाच ते सहा रुपयांनी तर शेंगदाणा तेल सात रुपयांनी वाढले आहे.
द्राक्षे बाजारात दाखल
गत आठवड्यापासून फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहे. डाळिंबाला गत आठवड्यात ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या दरातही वाढ झाली आहे. द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत. मात्र, आवक कमी असल्याने हिरवी द्राक्षे २०० रुपये तर काळी द्राक्षे २४० रुपये किलाेने विकली जात आहेत. द्राक्षाची आवक वाढल्यानंतर भाव कमी हाेणार असल्याचे सांगितले जात आहे.
द्राक्षे बाजारात नुकतीच दाखल झाल्याने भाव वाढले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. आवक वाढल्यानंतरच द्राक्षांचा भाव कमी हाेणार आहे.
- सलमान बागवान, फळ विक्रेता
गत दाेन आठवड्यांपासून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. कांद्याचे दर स्थिर आहेत. इतर भाजीपाला मात्र महागला आहे.
- ज्याेती भालेराव, भाजी विक्रेती