रस्त्यात फसतात वाहने, शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा?
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 27, 2023 04:08 PM2023-10-27T16:08:56+5:302023-10-27T16:10:25+5:30
किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
किनगाव जट्टू : हंगामाच्या वेळी शेतात तयार झालेला शेतमाल शेतातून घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवारची कसरत करावी लागत आहे. पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने जीवघेण्या शेत रस्त्यात शेतकरी अडकल्याचे चित्र किनगाव जट्टू परिसरात दिसत आहे. पाणंद रस्त्यात ट्रॅक्टर फसत असल्याने शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते शेतकऱ्याचे शेतीचे उत्पादन वाढीकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाच्यावतीने पालकमंत्री पाणंद रस्ते, मातोश्री पांदण रस्ते अशा विविध नावाने योजना काढण्यात आल्या आहेत. परंतु परिसरातील रस्त्यांचे कुठलीच कामे झाले नसून केवळ कागदोपत्रीच ही कामे पडून राहिल्याने बाराही महिने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी भरपूर प्रमाणात शेती पडीत राहत असल्याने शेती मशागतीचे अवजारे शेतकऱ्यांना कोठूनही नेता येत होते. परंतु कुटुंबातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण मालकीचे जमिनीचे क्षेत्र वहिती करण्यात आल्याने ते पूर्वीचे रस्ते बंद झाले आहेत. पूर्वीच्या वहिवाटीचे पांणद रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत.
शेतमाल अडकला रस्त्यात
किनगावजट्टू येथील शेतकरी खोटे यांच्या शेतातून सोयाबीनचा माल घरी आणण्यासाठी मालवाहू वाहन नेण्यात आले. दरम्यान, वसंतनगर शिवारातून सोयाबीनचा शेतमाल मालवाहू वाहनाने शेतातून घरी आणत असताना पाणंद रस्त्यात ते वाहन फसले. दरम्यान, दुसरे ट्रॅक्टर आणून ते वाहन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली.
रस्त्याला बघून ना ट्रॅक्टर येत, ना शेतमजूर
कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण झाले असल्याने पेरणीपूर्व मशागतीसह नागरणी वखरणी पेरणी कीटकनाशक फवारणी शेतीची इतर कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. परंतु अरुंद शेत रस्ते, त्यातही पावसाळ्यात गटारे होत असल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर शेतात मशागती करिता नेण्यासाठी ट्रॅक्टर मालक तयार होत नाहीत. शेतमजूरही रस्त्याच्या त्रासामुळे शेतात येत नाहीत.