टायरची तपासणी करूनच मिळणार समृद्धी महामार्गावर वाहनांना प्रवेश; वाढते अपघात राेखण्यासाठी उपक्रम
By संदीप वानखेडे | Published: June 9, 2023 03:50 PM2023-06-09T15:50:23+5:302023-06-09T15:51:00+5:30
यामध्ये अनेक सुविधा माेफत पुरवण्यात येणार आहेत.
बुलढाणा : हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता टायरची तपासणी करूनच प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी नागपूर व शिर्डी येथे ९ जूनपासून तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अनेक सुविधा माेफत पुरवण्यात येणार आहेत.
समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ राेजी लाेकार्पण झाले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून अपघात वाढले आहेत. वाढते अपघात राेखण्यासाठी परिवहन विभाग, महामाार्ग पाेलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर घडलेले काही अपघात हे वाहनांचे टायर फुल्याने झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे, वाढते अपघात राेखण्यासाठी खासगी टायर उत्पादक कंपनीच्या सहकार्याने टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी समृद्धी महामार्ग सुरू हाेत असलेल्या नागपूर व संपत असलेल्या शिर्डी येथील टाेलनाक्याजवळ टायर तपासणीचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर विविध सुविधा माेफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सुविधा मिळणार आहेत माेफत
नायट्राेजन भरणे
बेसिक एअर फिलिंग
टायर वेअर तपासणी
व्हॉल्व्ह तपासणी
व्हॉल्व्ह पिन चेक व रिप्लेसमेंट
बेसिक पंक्चर दुरुस्ती
टायर वेअर चेक यंत्राचे वितरण