पहिल्याच दिवशी शिक्षण हक्काची पायमल्ली
By admin | Published: June 28, 2016 01:58 AM2016-06-28T01:58:14+5:302016-06-28T01:58:14+5:30
विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत; ५ कोटी ८२ लाखांच्या निधीत गोंधळ.
विवेक चांदूरकर / बुलडाणा
शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना गणवेश देण्याचा नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत यावे लागले. याकरिता शासनाने ५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून, या निधीचा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येत आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशसाठी लागणार निधी देण्यात येतो. सदर निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे असलेल्या संयुक्त बँक खात्यात जिल्हा परिषद पाठविते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने सदर निधीतून गणवेश खरेदी करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना द्यायला हवा. सदर गणवेश परिधान करून विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी येईल, अशी शासनाची संकल्पना आहे. मात्र या संकल्पनेला जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला आहे. यावर्षी सदर निधी बुलडाणा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यांनी हा निधी शाळा व्यवस्थापन समितीला पाठविला. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. त्यामुळे सदर निधीचा योग्य विनियोग झाला की घोळ झाला, याबाबत संशय निर्माण होत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता मोताळा तालुक्यातील खडकी, खामखेड व राजुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या.
मात्र, यापैकी खामखेड वगळता दोन्ही ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे गणवेश नव्हता, असे अलका खंडारे यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंंत गणवेश पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.
गोड पदार्थ म्हणून दिली गोड खिचडी
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी गोड पदार्थ द्यायचा असल्यामुळे अनेक शाळांनी गोड खिचडी करून विद्यार्थ्यांंना दिली. मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ असणे आवश्यक होते. मात्र, शाळांनी चक्क खिचडीच गोड करून विद्यार्थ्यांंना दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी बैठक घेतल्यावरही अंमलबजावणी नाही
नियमानुसार विद्यार्थ्यांंना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळावा, याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांंपर्यंंत गणवेश पोहोचले नाहीत.