शासकीय रक्तपेढीत अत्यल्प रक्तसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:08+5:302021-08-13T04:39:08+5:30
सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. अपघातातील रुग्णांसह काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असते ते रक्त. मात्र, मागील काही दिवसांपासून ...
सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. अपघातातील रुग्णांसह काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असते ते रक्त. मात्र, मागील काही दिवसांपासून आणि कोरोनाच्या काळात बंद झालेले रक्तदान यामुळे येथील शासकीय रक्तपेढीत सध्या केवळ ६१ पिशव्यांच्या रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक ए पाॅझिटिव्ह रक्त गटाच्या २४ पिशव्या असून, इतर रक्त गटांच्या पिशव्यांची संख्या ही अगदीच तुटपुंजी आहे. यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असून, आता तरी तिसऱ्या लाटेच्या आधी जिल्ह्यात रक्ताचा साठा मोठा प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
असा रक्तसाठा
गट संख्या
ए पाॅझिटिव्ह २४
ए निगेटिव्ह ०१
बी पॉझिटिव्ह ०४
बी निगेटिव्ह ०२
ओ पॉझिटिव्ह १४
ओ निगेटिव्ह ०४
एबी पॉझिटिव्ह १२
एबी निगेटिव्ह ००
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या आधी उपाययोजना गरजेची
पुढील काही महिन्यांत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा पुन्हा रक्तदानाला खिळ बसणार आहे. मात्र, याच आधी उपाययोजना केल्यास येणाऱ्या काळात रक्ताचा तुडवडा जाणवणार नाही. तरी या संभाव्य लाटेच्या आधी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदात्यांनी आता या घडीला पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. तुमचे रक्त कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. तेव्हा संभाव्य लाटेच्या आधी दात्यांनी रक्तदानासाठी पुढे सरसावावे.
-ज्ञानेश्वर राऊत, रक्त संक्रमण अधिकारी, बुलडाणा.