विजय विजय असतो, प्रजेने त्यांना निवडले- गुलाबराव पाटील
By निलेश जोशी | Published: May 14, 2023 12:59 AM2023-05-14T00:59:58+5:302023-05-14T01:00:07+5:30
कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया, परंतु लोकसभा निवडणूक अद्याप लांबच
नीलेश जोशी, बुलढाणा: विजय हा विजयच असतो. लोकशाहीत प्रजा राजा आहे. त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. कर्नाटकमध्ये प्रजेने त्यांचा राजा निवडला असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे सांगितले. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप आढावा बैठकीचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान आपण काही कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेलो नव्हतो. त्यामुळे हा प्रश्न मला विचारणे सयुक्तिक नाही असेही त्यांनी सांगितले. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? याबाबत त्यांना छेडले असता लोकसभा निवडणूक अद्याप लांबच आहे, असे वक्तव्य करत त्यांनी या विषयाला बगल दिली. संजय राऊतांसंदर्भात प्रश्न केला असता हा काय बोलण्याचा विषय आहे का? असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला निरूत्तर करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
दरम्यान आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने बी-बियाणे, खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून कोठेही कमतरता पडणार नाही. अवकाळी पाऊस टप्प्याटप्प्याने पडला. त्यामुळे एकाच वेळी पंचनामे होऊ शकले नाही. परंतु आता ते १०० टक्के झाले आहे. त्यासंदर्भाने प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत देण्यासाठी आम्ही पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.
विचार घेऊन मैदानात या- खा. प्रतापराव जाधव
शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर करत असलेल्या वक्तव्यासंदर्भात यावेळी खा. प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता ते काहीही बोलतात. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. सेक्युलर झाले. राजीनामे देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा ते सल्ला देत असल्याबाबत ही खा. जाधवांनी त्यांचा समाचार घेतला. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचरणात आणा आणि मग मैदानात उतरा, असा टोलाच उद्धव ठाकरे यांना त्यांनी लगावला. दरम्यान २०२४ काय २०२९ मध्येही देशात भाजप-शिवसेनेची सत्ता राहील असे सांगितले. आघाडीमध्ये आताच बिघाडी आहे. त्यांची तोंडे तीन दिशेला आहे. येणाऱ्या काळात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल असे ते म्हणाले.