विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी, मेहकरमध्येही आंदोलन
By निलेश जोशी | Published: September 28, 2022 07:05 PM2022-09-28T19:05:33+5:302022-09-28T19:05:53+5:30
विदर्भवाद्यांकडून बुलढाण्यात नागपूर कराराची होळी करत आंदोलन केले.
बुलढाणा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक झाली असून वेगळ्या विदर्भ राज्याच्या संदर्भाने करण्यात आलेल्या नागपूर कराराची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ सप्टेंबरला होळी करण्यात आली. दरम्यान, मेहकर येथेही अशाच पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. बुलडाणा येथे प्रा. राम बारोटे, प्रकाश देशमुख, ॲड. सुभाष विमकर, सुखदेव नरोटे, दिनकर टेकाडे, ॲड. दीपक मापारी यांनी तर मेहकर येथे ॲड. सुरेश वानखेडे, संजय सुरळखर, प्रल्हादराव बाजड, देबाजे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी आंदोलन केले.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसंदर्भात १९५३ दरम्यान नागपूर करार करण्यात आला होता. मात्र आज जवळपास ६९ वर्षांनंतरही या कराराची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ निर्मिती मिशन-२०२३ सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आता हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून नागपूर कराराची बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. सोबतच मेहकर येथेही निदर्शने करण्यात आली. २८ सप्टेंबर २०२२ अर्थात नागपूर करार दिनीच ही होळी करण्यात आली. आता पुढील टप्प्यात २ ऑक्टोबरला महापुरुषांच्या पुतळ्यासमोर विदर्भवाद्याकंडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर ३ ऑक्टोबरला अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.
नागपूर अधिवेनसादरम्यानही आंदोलन करण्यात येणार आहे. अशा विविध तीन ते चार टप्प्यांवर हे आंदोलन होणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीसोबच विजेची दरवाढ मागे घ्यावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावा, पूर, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५ हजार रुपये तत्काळ मदत यावी, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या.