विदर्भ आंदोलन समितीचा ‘विदर्भ मिशन अॅक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:38 PM2019-12-17T14:38:50+5:302019-12-17T14:38:57+5:30
नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नववर्ष २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिशन २०२३’ हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन पावित्र्यात आहे. शासनाने लक्ष वेधण्यासाठी नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण कार्यकर्ता बैठकीसाठी सोमवारी बुलडाणा येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रंजना मामर्डे, अॅड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंडे, गणेश तायडे, कैलाश फाटे, डॉ. बाबुराव नरोटे, देविदास कणखर, समाधान कणखर, नामदेवराव जाधव, दामोदर शर्मा, डॉ. विनायक वाघ, हरिदास खांदेभराड उपस्थित होते. चटप म्हणाले, २०१४ च्या निवडणूकीत भाजपाने विदर्भातील जनतेला विदर्भाच्या नावाने मते मागितली. त्यांच्यावर विश्वास ठेवून जनेतेने मते दिली. परंतू शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला.
भाजपाने विदर्भाशी बेईमानी केली म्हणून महाराष्ट्रातून सत्ता गेली. स्वतंत्र राज्य निर्मिती करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. आता शिवसेना व भाजप वेगवेगळे झाल्याने भाजपच्या केंद्र शासनाला वेगळा विदर्भ द्यावाच लागेल. जनतेने वेगळ्या विदर्भाच्या लढाईत सामिल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
वेगळे विदर्भ राज्य द्या, विदर्भातील जनतेचे विजबिल निम्मे करा, विदर्भाला औष्णीक विज केंद्राच्या प्रदुषणाने मुक्त करा, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त व विज बिल मुक्त करा, शेतकऱ्यांना एकरी ३० हजार व फळबागेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
असा आहे 'विदर्भ मिशन अॅक्शन प्लॅन'
स्वतंत्र विदर्भ राज्यासह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ मिशन २०२३ अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर १ दिवसीय आत्मक्लेष आंदोलन, महावितरण अभियंता कार्यालयासमोर १५ ते २४ जानेवारी दरम्यान धरणे व निदर्शने, १० फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको, जेलभरो आंदोलन, २५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेले रोको आंदोलन व १ मे २०२० रोजी संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ आंदोलनचे नेते माजी आ. अॅड. वामनराव चटप यांनी केले.