सिंदखेड राजात विदर्भ साहित्य संमेलन भरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:55+5:302021-01-24T04:16:55+5:30
बुलडाणा : अनेक वर्षांनंतर संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पहिल्यांदाच संमेलन होत असल्याचा ...
बुलडाणा : अनेक वर्षांनंतर संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पहिल्यांदाच संमेलन होत असल्याचा आनंद झाला असून, भविष्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विदर्भ साहित्य संमेलन भरविणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.
बुलडाणा येथे आयोजित नेताजी जागर साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या संमेलनाची जबाबदारी साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्याकडे सोपवतो. बाकीचे सर्व काही सहकार्य मी करतो, अशी ग्वाही देतानाच सर्वांनी मिळून हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहनदेखील शिंगणे यांनी यावेळी केले. सामाजिक कार्य आणि नेताजींचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य करत असल्याबद्दल संयोजक सतीशचंद्र रोठे यांचेही त्यांनी कौतुक केले. महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे आल्या आहेत. राजकारणात त्यांना समान संधी मिळावी, म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, याचा धक्का पुरुषांना लागला आहे. महिलांनी पुढे जावे, प्रगती करावी याबाबत अजूनही पुरुषांची मानसिकता पक्की झालेली नाही. आरक्षणामुळे ते फक्त महिलांसोबत तडजोड करून घेत आहेत, असे विचार ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी यावेळी मांडले.
नेताजींनी स्वातंत्र्यलढ्यात वाहून घेतले : सुकेश झंवर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न होते. मात्र, जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर त्यांनी देशासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांना तरुंगवासही भोगावा लागला. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वोच्च अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. त्याचाही त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रभक्तीचे कार्य सुरू ठेवले, असे मत स्वागताध्यक्ष व बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केले.