विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा : खांदेवाले
By admin | Published: April 16, 2015 12:42 AM2015-04-16T00:42:23+5:302015-04-16T00:42:23+5:30
लोणार येथे विदर्भ कनेक्ट संघटनेची बैठक.
लोणार (जि. बुलडाणा): : सुमारे ५६ वर्षांंच्या कालखंडात राज्यकर्त्यांंनी अर्थसंकल्पात विदर्भाच्या हातात भोपळाच दिला आहे. त्यामुळे विदर्भाला विकासासाठी वाटच पाहावी लागत आहे. विकासाच्या बाबतीत विदर्भात सिंचन रस्ते, विद्युत, रोजगार यांसह सर्वच क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अनुशेष निर्माण झालेला असून, तो भरून काढण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायलाच हवा, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भाचे प्रणेते तथा विदर्भ कनेक्ट संघटनेचे अध्यक्ष अँड. निरज खांदेवाले यांनी केले. येत्या १ मेपर्यंंत विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्याकरिता चर्चा करण्यासाठी स्थानिक भागवत चित्र मंदिराच्या सभागृहात ११ एप्रिल रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश मापारी होते. खांदेवाले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, विदर्भात खनिज, पाणी, वीज आणि नैसर्गिक वनसंपदेची भरभराट आहे. हे असतानासुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ विकासाबाबत मागासलेलाच का? विदर्भाची संस्कृती वेगळी असून, या ठिकाणी वास्तव्यास असणार्या नागरिकांची जीवनशैलीही मुंबई, पुणे आणि नाशिक येथील नागरिकांच्या जीवनशैलीपेक्षा वेगळीच आहे. यामुळे इंग्रज राजवटीत लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी ब्रिटिश महाराणीकडे केली होती. विदर्भाला इंग्रज राजवटीतच स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता. तरीसुद्धा १ मे १९६0 रोजी विदर्भाला नागपूर कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोंबले गेले. १९६0 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाला विकासाबाबत झुकते माप देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र विदर्भातील तरुणांना शासकीय नोकरीत केवळ सात टक्केच वाटा मिळतो. अकोला येथील कृषी विद्यापीठ नगर जिल्ह्यातील राहुरी येथे नेण्याचे षड्यंत्र सरकारने केले होते. विदर्भाचा हा इतिहास रक्तरंजित असल्याचेही अँड. खांदेवाले यांनी सांगितले.