महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य- चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:20 AM2017-09-15T00:20:31+5:302017-09-15T00:21:01+5:30
२0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: विदर्भाला कायम दुर्लक्षित ठेवून विदर्भाच्या वाट्याचा २३ टक्के विकास निधी विदर्भाला न देता इतरत्र पळवून नेणे, राज्याचा कायम तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्यातील नोकर्यांच्या तुलनेतही विदर्भातील बेरोजगारांना न मिळणार्या नोकर्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजवर विदर्भाचा जवळपास ७५ हजार कोटी रुपयांचा अनुशेष कधीही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे २0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १३ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत अँड. चटप बोलत होते. यावेळी अँड. सुरेश वानखेडे, देवीदास कणखर, भिकाजी सोळंकी, मुरलीधर महाराज येवले यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अँड. वामनराव चटप म्हणाले की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर करार आणि केळकर समितीच्या अहवालांची होळी विदर्भातील सर्वंच जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, खामगाव आणि मलकापूर येथे ही होळी आयोजित करण्यात येणार असून, लगतच्या तालुक्यातील विदर्भवाद्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले. करून सिंचन, रस्ते विकास, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागातील विदर्भाचा अनुशेष ७५ हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार सन २0२८ पर्यंत हा अनुशेष भरून काढल्या जाईल; परंत पुढील हजार वर्षापर्यंतही हा अनुशेष भरून काढणे कोणाच्याही सरकारला शक्य होणार नसल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे अँड. चटप म्हणाले. विदर्भातील बेरोजगारांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना निधीप्रमाणे नोकर्यांच्या अनुशेषातही सातत्याने वाढच होत आहे त्यामुळे बेरोजगारांचाही अनुशेष वाढतच आहे. त्यामुळे आता सरकारने वेगळे स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अशी मागणी यावेळी वामनराव चटप यांनी केली.
१५ ऑक्टोबरला खासदारांचा राजीनामा मागणार!
विदर्भातील १0 खासदारांपैकी एकाही खासदाराने राधामोहनसिंग यांचे वक्तव्य खोडून काढले नाही. त्यामुळे विदर्भाच्या निर्मितीसाठी आणि विदर्भातील शेतकर्यांचा अपमान होत असताना संसदेत तोंडही न उघडणार्या खासदारांनी राजीनामाच दिला पाहिजे म्हणून आधी नितीन गडकरी यांचा राजीनामा मागितला होता. आता १५ ऑक्टोबरला बुलडाण्याच्या खासदारांचा बुलडाणा येथे जाऊन राजीनामा मागणार असल्याची माहिती यावेळी अँड. चटप यांनी दिली.