कॉपीबहाद्दरांवर राहणार ‘व्हिडिओ कॅमेर्याचा वॉच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:08 AM2018-02-17T01:08:09+5:302018-02-17T01:09:00+5:30
ब्रह्मनंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान होणार्या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिकचे (बारावी) इंग्रजी व गणित हे दोन विषय आणि माध्यमिकचे (दहावी) इंग्रजी, गणित-१, गणित-२ या तीन पेपरच्या कालावधीत कॉपी बहाद्दरांवर व्हिडिओ कॅमेर्यांचा वॉच ठेवण्यासाठी जिल्हानिहाय खर्चाची र्मयादा १२ हजार रुपये देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत होणारी इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळले जावे, यादृष्टीने भरारी पथकांच्या स्थापनेबरोबरच परीक्षा केंद्र परिसराचे चित्रीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्या अनुषंगाने परीक्षा काळातील चित्रीकरणासाठी जिल्हानिहाय १२ हजार रुपये खर्चाची र्मयादा ठेवण्यात आली आहे. इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर २१ फेब्रुवारीला व गणित ३ मार्च रोजी होत असून, या दोन्ही परीक्षेला व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर ८ मार्च, गणित-१ विषयाचा पेपर १0 मार्च आणि गणित-२ विषयाचा पेपर १२ मार्च रोजी होणार असून, या तीन पेपरला व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. परीक्षा केंद्र व केंद्राच्या बाहेरील परिसर, व्हरांडा, कंपाऊंडचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या भरारी पथक प्रमुखांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कॅमेरे पुरवणार आहेत. व्हिडिओ चित्रीकरणाच्या या उपक्रमामुळे परीक्षा काळात होणार्या गैरप्रकाराला चाप बसणार आहे.
अशी पाळावी लागणार दक्षता
परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करताना ज्या केंद्राचे चित्रीकरण चालू असेल त्या केंद्राचे नाव, जिल्हा, कोणत्या स्थानावर कॅमेरा आहे, पेपरचा विषय यांचे थोडक्यात समालोचन भरारी पथक प्रमुखांना करावे लागणार आहे. चित्रीकरण पथकाने परीक्षा केंद्राच्या दालनामध्ये, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या दालनामध्ये चित्रीकरण करू नये, तसेच परीक्षार्थी, पालक, परीक्षा केंद्रावरील कर्मचारी यांच्या मुलाखती घेऊ नयेत व परीक्षार्थींना कुठलाही अडथळा होणार नाही, याची दक्षता बाळगण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान व्हिडिओ चित्रकरण करण्यात येणार असून, चित्रीकरणामुळे परीक्षार्थ्यांना पेपर लिहिण्यास परीक्षा संचालनालयात अडथळा होणार नाही. परीक्षार्थींचे लक्ष विचलीत होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाणार आहे.
- श्रीराम पानझाडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.