VIDEO : 100 रुपयांच्या नोटा नसल्याने बाजार समित्या बंद, शेतकरी अडचणीत
By Admin | Published: November 9, 2016 03:56 PM2016-11-09T15:56:30+5:302016-11-09T16:00:00+5:30
ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे ...
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 9 - केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला. 100 रुपयांच्या नोटा नसल्याने व्यापा-यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. शेतक-यांना याची कल्पना नसल्यामुळे अनेक शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेवून आले आहेत. त्यामुळे शेतक-यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतमाल घेवून आले होते. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. शेतमाल खरेदी करणा-या व्यापा-यांनी सुट्टे पैसे नसल्याने चक्क बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्यावर त्यांना हजारो रूपये द्यावे लागतात.
अनेक व्यापारी एटीएम किंवा बँकेतून पैसे काढतात. मात्र, दोन दिवस बँक बंद असून, व्यापा-यांकडे सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गावातून हजारो रूपये भाड्याचे वाहन करून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी घेवून येतात. बाजार समिती बंद असल्याची जराही कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांना वाहनाचे भाडे देण्याचा भुर्दंड सहन करावा लागला. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखली, मेहकर तालुक्यासह शेकडो किलोमीटरवरुन शेतकरी शेतमाल घेवून येतात. व्यापा-यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याच्या भूमिकेमुळे शेतक-यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
हमालांवर उपासमारीची वेळ
हमाल व मापाडी कामगार यांचा उदनिर्वाह बाजार समितीतील दररोजच्या उत्पन्नावर चालत असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये हमाल व मापाडी आले. मात्र, त्यांना बाजार समिती बंद असल्याचे समजले. व्यापा-यांनी अचानक बंद पुकारल्यामुळे हमाल, मापाडींचा एक दिवसाचा रोजगार बुडाला आहे.
बंदची अधिकृत घोषणा नाही
व्यापा-यानी बुधवारी कृषि उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत व्यापारी संघटनेने कोणतेही पत्र किंवा अधिकृत घोषणा केली नाही. - वनीता साबळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा.
शेतक-यांना आर्थिक भुर्दंड
नेहमीप्रमाणे सोयाबिन विक्रीसाठी आणले होते, मात्र बाजार समिती बंद असल्याने आता शेतमाल परत न्यावा लागला. यामुळे वाहनाचे भाडेही द्यावे लागणार असल्याने अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. - सर्जेराव भुतेकर, शेतकरी, पाडळी.
धुळ्यातही कृषि उत्पन्न बाजार समिती बंद
दरम्यान, शंभर रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात नसल्याने धुळे आणि पिंपळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी आणि समितीच्या पदाधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.
https://www.dailymotion.com/video/x844hg0