गाव झाले भकास, नागरिकांनी कुटुंबासह शेतात थाटले बिऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:05+5:302021-04-30T04:44:05+5:30
साखरखेर्डा परिसरातील सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा, शिंदी, गुंज, वरोडी, शेवगा जाहागीर, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, ...
साखरखेर्डा परिसरातील सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा, शिंदी, गुंज, वरोडी, शेवगा जाहागीर, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, लिंगा, बाळसमुंद्र, राजेगाव, जागदरी, जनुना तांडा, शेंदुर्जन, कंडारी, भंडारी, आंबेवाडी, हनवतखेड, हिवरा गडलिंग यासह असंख्य गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्या लाटेत रुग्ण कमी असल्याने गाव सोडून जाण्याची पाळी आली नव्हती. फेब्रुवारीपर्यंत खेडी कोरोनामुक्त होती. मार्चपासून खेड्यापाड्यात, वस्ती, तांड्यावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शासकीय अकडेवारी जाहीर होत असली तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे आज या गावातील अमुक व्यक्ती कोरोनामुळे दगावल्याची माहिती कानावर पडत होती. शिंदी, साखरखेर्डा, राताळी येथे तर कहरच झाला होता. शिंदी येथील शेतकऱ्यांनी घराला कुलूप लावून आपले बिऱ्हाड पाठीवर लादून शेतात मांडले आहे. केवळ शिंदी येथीलच शेतकरी नाहीत, तर इतर खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी शेतातच राहणे पसंत केले आहे.
शेतकरी शेतात राहत असताना जीवनावश्यक वस्तूंची तजबीज त्यांनी केली आहे. परंतु शेतात वीज नसल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे. या मतदारसंघाचे आ. तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारुन शेतातील वीजपुरवठा सिंगल फेज सुरु करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतात राहत असताना ना पंखा, ना कुलर निसर्गरम्य परिसरात कोरोना येणार कोठून ! या आत्मिक भावनेतून त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना वाटते.