सरपंचाविरोधात एकवटले गाव!
By admin | Published: October 17, 2016 02:31 AM2016-10-17T02:31:49+5:302016-10-17T02:31:49+5:30
बोरगाव काकडे या गावच्या ग्रामसभेत सरपंचाचा राजीनामा घेण्याचा ठराव पारित.
चिखली, दि. १६- बोरगाव काकडे येथील ग्रामस्थांनी सरपंचावरच अविश्वास दर्शवित ग्रामविकासात सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून सरपंचांनी राजीनामा द्यावा, असा एकमुखी ठराव घेतला आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ग्रामसभेत हा ठराव पारित झाला त्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खुद्द सरपंच असल्याने ही ग्रामसभा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून बहुदा असा ठराव पारित होण्याची ही राज्यातली पहिलीच वेळ असावी.
चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे या गावाने रविवारी हा ठराव घेतला आहे. ग्रामपंचायत भवनात बोरगाव काकडे गावच्या सरपंच उषा नामदेव खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत विविध ठराव घेण्यात आले.
याअंतर्गतच घेण्यात आलेल्या ठराव क्रमांक ६ मध्ये ग्रामस्थांनी सरपंच उषा खरात यांच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी दर्शवून ग्रामविकासात त्या सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवल्याने सरपंच खरात यांच्यावर त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करून हा ठराव एकमुखाने पारित होताना पाहण्याची नामुष्की ओढवली.
दरम्यान, या ग्रामसभेत नागरिकांनी सरपंच उषा खरात यांच्यावर विविध आरोप केले असून यामध्ये गत ३१ ऑगस्ट २0१५ पासून सरपंचपदावर असलेल्या खरात यांनी वर्षभरात ग्रामसभा परिपत्रकानुसार गाव विकासाच्या दृष्टीने अजिबात काम केले नाही, गावात नालेसफाई, पथदिवे, निर्मल ग्राम, आरोग्य सुविधा या विविध योजनांकडे साफ दुर्लक्ष केले तसेच १४ वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असूनसुद्धा विकासाची कामे केली नाही, वैयक्तिक हितसंबंध जोपसण्यासाठी त्यांच्या अधिकारात नसतानाही शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाचा नमुना आठ ह्यअह्ण मध्ये नोंदी घेण्याचा ठराव घेतला, सार्वजनिक हित न पाहता जवळच्या लोकांचा व वैयक्तिक हित जोपसण्यासाठी मागील ग्रामसभेत मंजूर कामांना डावलून स्वत:ला व सहकार्यांना फायदा होईल अशी कामांचा ग्रामपंचायत मासिक मिटिंगमध्ये ठराव घेतला.