आठ गावांमधील गावकऱ्यांची महावितरणच्या उपकेंद्रावर धडक
By विवेक चांदुरकर | Published: July 10, 2024 03:55 PM2024-07-10T15:55:40+5:302024-07-10T15:56:07+5:30
सिंगल फेज विज पुरवठ्याची मागणी.
विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: दिवसांतून अनेकदा विज पुरवठा बंद होत असून, तासनतास सुरू होत नाही. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत असल्याने हिंस्त्र प्राण्यांपासून जीवाला धोका असल्याने त्रस्त झालेल्या आठ गावांतील गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रावर बुधवारी सकाळी धडक दिली. सिंगल फेज विज पुरवठ्याची मागणी करत एकच गदारोळ केला.
तालुक्यातील महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावांतील गावकरी वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. दिवसांतून २० ते २५ वेळा विजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतातील पिकांना पाणी द्यायचे कसे? त्याचबरोबर परिसरात वावर असणाऱ्या हिंसक वन्य प्राण्यांपासून संरक्षण करायचे कसे? हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये खदखदत होता. त्याच धरतीवर मलकापूर तालुक्यातील काळेगांव, हरसोडा, झोडगा, अनुराबाद, धोंगर्डी, वडोदा, पान्हेरा, बहापूरा येथील गावकरी एकवटले. बुधवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या हरसोडा उपकेंद्रावर धडक देवून गदारोळ माजवला. यावेळी सहाय्यक अभियंता गोपाल बावस्कर यांच्याशी संतोष रायपूरे व गावकऱ्यांची चर्चा झाली. आठ गावातील गावकऱ्यांनी महावितरण कंपनीला निवेदन सादर केले आहे. त्यात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणींचा उहापोह करुन योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर, संतोष रायपूरे, काळेगांवचे उपसरपंच मंगेश पटेल, गुणवंत पवार, तेजराव रायपूरे, शंतनु गुलगे, दिगंबर घागरे, अशोक रायपूरे, बाबूराव झाल्टे, गणेश झाल्टे, विठ्ठल मुके, सुंदरलाल पटेल, संजय पटेल, शुभम पटेल, संजय मोरे, बाळू जवरे, राजू जाधव आदींसह असंख्य गावकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
फोटो आहेत.