रस्ता डांबरीकरणासाठी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 06:01 PM2018-10-16T18:01:01+5:302018-10-16T18:01:35+5:30
रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : येथून जवळच असलेल्या पळशी झांशी गावाकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाल्याने या गावाला चांगला रस्ता नाही. त्यामुळे या गावाला जोडणाºया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी या गावाला दळण वळणासाठी रस्ता असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे येथील नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या गावातील नागरीकांना अगदी लहान-सहान कामांसाठी संग्रामपूरला यावे लागते. संग्रामपूर ते पळशी झांशी या पाच किलोमिटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी १६ आॅक्टोबर रोजी पळशी झांशी येथील ग्रामवासियांनी ढोल ताशांच्या गजरात तहसिलदार संग्रामपूर यांना निवेदन दिले. यावेळी महिला, पुरूष, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पळशी झाशी गावची लोकसंख्या पाच ते साडे पाच हजाराच्या जवळपास आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव असल्याने नागरीकांना दररोज संग्रामपूर येथे यावे लागते.
रूग्णाची प्रकृती बिघडल्यास रात्री-बेरात्री संग्रामपूर येथे रूग्णालयात दाखल करावे लागते. अशावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा त्रास होतो. दररोज शाळेत येणाºया विद्यार्थ्यांनाही या खडतर रस्त्याने यावे लागत असल्याने त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थी सायकलीने ये-जा करतात. काही विद्यार्थी शाळेत पायी येणे-जाणे करतात. असे असताना, संबंधित प्रशासनाकडून सदर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी १६ आॅक्टोबर रोजी पळशी येथील ग्रामस्थांनी ढोल ताशांचा गजर करून प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला व तहसीलदार यांना निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
पळशी झाशी गावाला अद्याप चांगला रस्ता नाही. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबर पर्यंत संग्रापूर ते पळशी झाशी या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात करावी. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात न केल्यास २५ आॅक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.