वैद्यकीय अधिकाऱ्याविरूध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:27 PM2019-03-17T14:27:01+5:302019-03-17T14:27:24+5:30
डोणगाव: आदर्श आचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या विरोधात डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोणगाव: आदर्श आचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या विरोधात डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मेहकर येथील फिरत्या पथकाचे प्रमुख तथा पालिकेचे स्थापत्य अभियंता यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोकार्पण सोहळा फलकाचा फोटो असल्याची तक्रार सीव्हीजील अॅपवर मेहकर येथील फिरत्या पथकाचे प्रमुख तथा पालिकेतील स्थापत्य अभियंता अजय अशोकराव मापारी यांना मिळाली होती. त्यानुषंगाने मेहकर येथून त्यांनी डोणगाव गाव गाठले. तेथे डोणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण खनपटे, नायक पोलिस कॉन्स्टेबल किसन साळवे यांना सोबत घेऊन त्यांनी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आरोग्य केद्राच्या समोरील भिंतीवर लोकार्पण सोहळ््याचे फलकावर पूर्ण पणे पांढरे प्लॉस्टिक टाकून ते झाकण्यात आले असल्याचे आढळून आले. मात्र संबंधित फलक हा तक्रार प्राप्त झाल्यानंतर झाकल्याचे निदर्शनास येत असल्याचे मापारी यांनी डोणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवईंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आचारसंहीता भंगाचा जिल्ह्यातील तिसरा गुन्हा
चिखली येथे एक दिवसापूर्वीच पोस्ट मास्तर विरोधात अशाच प्रकारे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरचा हा घाटावरील भागातील दुसरा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. परिणामी येत्या निवडणुकीत सीव्हीजील अॅप सर्व सामान्यांसाठी एक मोठे अस्त्र म्हणून समोर येत आहे. शेगावातही एक गुन्हा दाखल झाला होता.