नियमांचे उल्लंघन : अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू असतानाही तीच ती कारणे देऊन नागरिकांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:51+5:302021-04-29T04:26:51+5:30
राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी महामंडळाची बससेवा बंद ठेवली ...
राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी महामंडळाची बससेवा बंद ठेवली असून, फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांसाठीच बससेवा सुरू ठेवली आहे. तर ज्या नागरिकांना बसने प्रवास करायचा आहे, त्यांना आवश्यक सेवेचा पास काढण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही अनेक नागरिक विविध कारणे सांगून बसने प्रवास करीत आहेत. यामध्ये विशेषतः एखाद्या ग्रामीण मार्गावरून शहरात बस येताना हे प्रवासी वाहकाने प्रवासाचे कारण विचारल्यावर, साहेब तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात जायचे आहे, कधी जवळच्या नातलगाला रुग्णालयात भेटायला जायचे आहे, तर कधी अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे देऊन प्रवास करतात. ही कारणे सांगितल्यामुळे बस वाहकही जास्त चौकशी न करता प्रवेश देतो. नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून उपाययोजना होत असल्या तरी नागरिक जुमानत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.
--पास न काढताही सुरू आहे प्रवास--
शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला दहा ते बारा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच नागरिकांतर्फे विविध कारणांनी नागरिक प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. यात सुरुवातीपासूनच रुग्णालयात आणि अंत्यसंस्काराला जाण्याची ही दोन महत्त्वाची कारणे सांगत आहेत; तर बोटांवर मोजण्याइतक्याच नागरिकांकडून या कारणासाठी रीतसर शासनाच्या परवानगीचा पास असतो.
---
सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाया कर्मचाऱ्यांसाठीच सेवा असून, प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवाशांनी रुग्णालयाचे किंवा अंत्यसंस्काराचे कारण सांगितल्यावर प्रवेश दिला जातो. वाहक खात्री करूनच प्रवेश देतात.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.
------
जिल्ह्यातील एकूण आगार : ७
सध्या सुरू असलेल्या बसफेऱ्या : २० ते २५