काेराेना काळात नियमांचे उल्लंघन, ५३़ ७१ लाखांचा दंड वसूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:45+5:302021-06-21T04:22:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्गाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतुक शाखेने विशेष माेहीम राबवली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना संसर्गाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतुक शाखेने विशेष माेहीम राबवली. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८४ हजार २७१ वाहनचालकांकडून ५३ लाख ७१ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत होती. पूर्णत: लॉकडाऊन असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते. अशांना पोलीस कारवाईचा फटका बसला आहे. मागील वर्षी २०२० मध्येसुद्धा पाच महिन्यांच्या कालावधीत लॉकडाऊन होते. त्यावेळीही पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली हाेती. यावर्षीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पाेलिसांनी कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते मेदरम्यान पाेलिसांनी तब्बल ८४ हजार जणांवर कारवाई केली आहे.
काेराेना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणी तयारी करताना दिसत नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येत आहेत. जेणेकरून गर्दी टाळता येईल व अपघात कमी होतील. वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
नाे पार्किंगसाठी चार लाखांचा दंड
जिल्हाभरात नाे पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या ९ हजार १८७ वाहन चालकांकडून ४ लाख २८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या सहा महिन्यांत ही कारवाई करण्यात आली.
लायसन्स न बाळगण्यासाठीही दंड
अनेक वाहनचालक लायसन्स असूनही जवळ बाळगत नाही. अशांना २०० रुपये दंड करण्यात येताे. तसेच ज्यांच्याकडे लायसन्स नाही अशांना ५०० रुपयांचा दंड करण्यात येताे. या कारवाईची संख्या अधिक आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येते. काेराेना संसर्ग वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले हाेते. या निर्बंधांच्या काळातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. इतरही नियमानुसार कारवाई करून ५३ लाख ७१ हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली हाेती. दंडात्मक कारवाईनंतरही अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात.
-एन. एम. परदेशी, पाेलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा