शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:23+5:302021-09-06T04:38:23+5:30
गजानन तिडके देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे़ काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन ...
गजानन तिडके
देऊळगाव राजा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे़ काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असले तरी शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे़ त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़ देऊळगाव राजा शहरासह ग्रामीण भागातील हे चित्र आहे़
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेकजण काेराेनाविषयी गंभीर नसल्याचे चित्र आहे़ काेराेनाविषयक जनजागृती करणाऱ्या आराेग्य विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष हाेत आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे़ अनेक रुग्ण मास्कही लावत नाहीत़ तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन हाेत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, काेराेनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे़ याकडे आराेग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
औषध विक्रेत्यांचेसुद्धा दुर्लक्ष
डाॅक्टरांकडून आलेले रुग्ण औषध विक्रेते दुकानांमध्येही माेठी गर्दी हाेत आहे़ अनेक रुग्ण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे़ याकडे औषध विक्रेत्यांचे दुर्लक्ष हाेत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ मास्क न लावणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची गरज आहे़
ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे़ अपघाताग्रस्तांना, तसेच तापाच्या रुग्णांना रेफर टू जालना करण्यात येते़ रुग्णालयाला मिळालेल्या रुग्णवाहिकेचा उपयाेगही हाेत नसल्याचे चित्र आहे़ रुग्णांनी रुग्णवाहिकेची मागणी केली असता डिझेलचा खर्च करा आणि घेऊन जा, असा सल्ला देण्यात येताे़ अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे़; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अद्ययावत सुविधांचा वापर हाेत नसल्याचे चित्र आहे़
ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी शासनाच्या कोरोनाविषयक निर्बंधाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील़ कोरोनाची संभाव्य तिसरी लाट बघता या सर्व सूचनांचे पालन करावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयांमध्ये सूचनांचे पालन होत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
डाॅ़ दत्ता मांटे, तालुका आरोग्य अधिकारी देऊळगाव राजा