बांधकाम साहित्य हटविण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या
By विवेक चांदुरकर | Published: May 20, 2024 06:28 PM2024-05-20T18:28:36+5:302024-05-20T18:28:50+5:30
सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले.
मलकापूर : सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. मात्र उर्वरित बांधकाम साहित्य तेथेच ठेवले. यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे गावकऱ्याने बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गत काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नांदुरा तालुक्यातील सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. यात जुन्या पुलाचे अवशेष, मटेरियल, माती नदीच्या पात्रात तशीच ठेवण्यात आली. आगामी पावसाळ्यात पुरामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
याबाबत केशव त्र्यंबक बाठे पाटील यांनी संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना वारंवार पत्र देवून माहिती दिली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्याने थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे खळबळ उडाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केशव बाठे पाटील यांना लेखी पत्र देऊन आठ दिवसांत कारवाईसाठी आश्वस्त करण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास मुख्य अभियंता अकोला यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा बाठे पाटील यांनी दिला आहे.