मलकापूर पांग्रा येथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
By Admin | Published: September 13, 2016 01:50 PM2016-09-13T13:50:54+5:302016-09-13T13:50:54+5:30
गत तीन वर्षांपासून एका मुस्लीम व्यक्तीला णेश मंडळांचा अध्यक्ष बनवून येथील गावक-यांनी धार्मिक वादाच्या भिंती तोडल्या आहेत.
>ऑनलाइन लोकमत
मलकापूर पांग्रा, दि. १३ - गत तीन वर्षांपासून एका मुस्लीम व्यक्तीला णेश मंडळांचा अध्यक्ष बनवून येथील गावक-यांनी धार्मिक वादाच्या भिंती तोडल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मतेत गावात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
सध्या गणेश उत्सवाची सर्वत्र धामधूम आहे. मलकापूर पांग्रा येथे सुद्धा दरवर्षी साई एकता गणेश मंडळाच्यावतीने गणरायाची प्रतिष्ठापना होते. येथील गणेश मंडळामध्ये आजपर्यंत तीन वेळा फकीरा पठाण या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला अध्यक्ष करण्यात आले. एकात्मतेची भावना वृद्धींगत व्हावी, गावात सलोखा आणि बंधुभाव नांदावा व तो कायम टिकावा म्हणून मलकापूर पांग्रातील या एकात्मतेच्या प्रयत्नांना आजपर्यंत गालबोट लागलेले नाही.
यावर्षीही साई एकता गणेश मंडळाने दगडूसेठ हलवाई मुर्तीची स्थापना केली. पोलीस स्टेशनच्यावतीने अन्य गावांना मलकापूर पांग्रा या गावापासून सामाजिक सलोख्याचा धडा घेण्याचे आवाहन नेहमीच करण्यात येते. या गावापासून एकात्मता कशी टिकवली जाते, हे शिकण्याचेही आवाहन करण्यात येते.
सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात एकतेच्या परंपरेला टिकवण्यासाठी हिंदू- मुस्लिम बांधव कसोसीने प्रयत्नरत राहणार आहे. यावर्षी गणेश मंडळाच्या अध्यक्षस्थानी फकीरा पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी पवन दाभेरे यांची निवड झाली आहे.