विवेकानंद गोशाळेसाठी चारा दाते सरसावले!
By admin | Published: February 4, 2016 01:33 AM2016-02-04T01:33:12+5:302016-02-04T01:33:12+5:30
दुष्काळात चा-याची गंभीर समस्या; महसूल विभागाकडून पाहणी.
हिवरा आश्रम (जि. बुलडाणा): विवेकानंद आश्रमच्या गोशाळेतील गाई-वासरांच्या चार्याला मंगळवारी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने दीडशे ट्रॉली कडबाकुट्टी जळून खाक झाली, तर दोनशे ट्रॉली कडबाकुट्टी खराब झाली. त्यामुळे येथील जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला. ही परिस्थिती पाहता, बुलडाणासह अकोला, वाशिम जिल्ह्यांतूनही शेकडो शेतकर्यांनी दूरध्वनी करून चारा पाठवत असल्याचे विवेकानंद आश्रमास कळविले आहे. जनावरांसाठी चारा घेऊन येणारे शेकडो हात समाजातून पुढे आले आहेत. विवेकानंद आश्रमद्वारा संचलित गोशाळेची सुमारे २५३ ट्रॉली कडबाकुट्टी अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिली होती. या आगीत दीडशे ट्रॉली कडबाकुट्टी जळून खाक झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले; तर दोनशे ट्रॉली कडबाकुट्टी आग व धुरामुळे खराब झाल्याने मुकी जनावरे ती खाणार नाहीत. परिणामी, गोशाळेतील दीडशे गाई, वासरे व इतर जनावरे मिळून दोनशे जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याकरिता ऐन दुष्काळात विवेकानंद आश्रमापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या घटनेचा महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामा करण्यात आला असून, नायब तहसीलदार रतन डाके यांनी ३ फेब्रुवारीला घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.