विवेकानंद आश्रमाने जपला आदिवासी सेवेचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:49+5:302021-08-12T04:39:49+5:30
हिवरा आश्रम : या भूमीच्या जल, जमीन आणि जंगल यांना दैवत मानणारा आदिवासी बांधव पुढारलेल्या व प्रगतीशील समाजाच्या ...
हिवरा आश्रम : या भूमीच्या जल, जमीन आणि जंगल यांना दैवत मानणारा आदिवासी बांधव पुढारलेल्या व प्रगतीशील समाजाच्या मागे राहिला आहे. भारतीय संस्कृतीच्या समृध्द परंपरांचा वारसा जपणारा हा समाज देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प. पू. शुकदास महाराजांचा त्यांच्याप्रती असलेला विकासात्मक दृष्टीकोन व त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष कार्यामुळे मोठा वर्ग संस्थेशी जोडला आहे. संस्थेने अनेक आदिवासी गाव विकासासाठी दत्तक घेतले आहेत. प. पू. महाराजांचा या समाजाच्या कल्याणाचा व उत्कर्षाचा वसा संस्था पुढे चालू ठेवेल, असे विचार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी व्यक्त केले.
आदिवासी दिनानिमित्त साेमवारी आश्रमात आदिवासी बांधवांसोबत संवाद साधताना ते बाेलत हाेते. यावेळी आलेल्या आदिवासी बांधवांसाठी मिष्ठान्न भोजन तसेच सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रध्दा या बाबी प्रगतीतील मोठा अडथळा असून प्रत्येकाने शिक्षणातून ज्ञान संपादन करावे व स्वतःच्या कल्याणाचा व समृध्दीचा प्रयत्न करावा. संस्था त्याच्यासोबत सर्व सामर्थ्यानीशी उभी आहे असेही त्यांनी पुढे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम ठोंबरे होते. सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांची पूर्तता करावी असे आवाहनही त्यांनी केले. विवेकानंद ज्ञानपीठातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक थोरहाते, संतोष गोरे, आत्मानंद थोरहाते, पुरूषोत्तम आकोटकर, माजी सरपंच निर्मला डाखोरे, मधुकर शेळके, ए. एन. जामकर, विवेकानंद ज्ञानपीठच्या प्राचार्य प्रणिता गिऱ्हे, काकड , लाकडे आदी उपस्थित होते.