'स्टॅच्यू ऑफ ह्यूमिनीटी'साठी विवेकानंद आश्रमाकडून दीड कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:53 PM2020-02-16T15:53:21+5:302020-02-16T15:53:45+5:30
राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे आश्रमाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारच्या सकारात्मक निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : शुकदास महाराज यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिल्या जाणारा स्टॅच्यू आॅफ ह्युमिनिटीच्या निमार्णाधीन कार्याचा वेग राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्याअभावी मंदावला आहे. या प्रकल्पासाठी विवेकानंद आश्रमाने आतापर्यंत दीड कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. यासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी हवा आहे. याबाबत राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे आश्रमाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारच्या सकारात्मक निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.
देशातील सर्वात उंचीचा स्वामी विवेकानंद यांचा पुतळा असलेले विवेकानंद स्मारक बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे कोराडी जलाशयात साकारले जात आहे. त्यासाठी विवेकानंद आश्रमाकडे या जलाशयातील पाच एकराचे नैसर्गिक बेट राज्य सरकारने हस्तांतरित केलेले आहे. या बेटाचा आश्रमाने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून विकास केला असून, तेथे सर्व जातीय व धर्मिय नागरिकांच्याहस्ते महापूजा करून स्वामी विवेकानंद यांचा विशाल पुतळाही स्थापित करण्यात आला आहे. तसेच, बेटावर छान अशा वृक्षवेलींचा निसर्गरम्य परिसरही विकसित करण्यात आला आहे. तथापि, प्रस्तावित असलेले १११ फूट उंचीचे विवेकानंद स्मारक, रोप-वे, ध्यान केंद्र, लॉन व बागबगिचा यांच्या विकासासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी हवा आहे. या निधीसाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने राज्य सरकारकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर कोराडी जलाशयात देशातील सर्वात उंच असे स्वामी विवेकानंद यांचा स्टॅच्यू आॅफ ह्युमिनीटी साकरले जाणार आहे. विवेकानंद आश्रम येथे येणाऱ्या लाखो पर्यटक व भाविकांसाठी हे स्मारक पर्वणी ठरणार आहे. (वार्ताहर)