निराधार चिमुकल्यांना विवेकानंद आश्रमाने दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:00+5:302021-07-15T04:24:00+5:30
हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा आधार ...
हिवरा आश्रम : पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेल्या महिलेचा नुकताच कर्कराेगाने मृत्यू झाला़ त्यामुळे आई आणि वडिलांचा आधार गेल्याने पाेरक्या झालेल्या चिमुकल्या भावंडांना हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाने आधार दिला़ या मुलांचे पालकत्व आश्रमाने स्वीकारले आहे़ पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर साेडलेली सीमा साेनुने नावाची महिला काही वर्षांपूर्वी हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमात आली हाेती़ मिळेल ते काम करून ती आपला व दाेन मुलांचा सांभाळ करीत हाेती़ काही दिवसांपूर्वीच तिला कर्कराेग झाल्याचे निदान झाले हाेते़ उपचार सुरू करण्यापूर्वीच ८ जुलै रोजी तिचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे आदित्य व गायत्री ही मुले आईविना पोरकी झाली. या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विवेकानंद आश्रमाने घेतली आहे. कोणीही नातेवाईक नसलेली व आधार नसलेली ही भावंडे आश्रमाची मुले म्हणून जगणार आहेत. त्यांना निवास, भोजन, शिक्षण व आरोग्य या सुविधा आश्रमातर्फे मिळणार आहेत.
आश्रमाने दिला आधार
सीमासारख्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या, संशयी पतीने झिडकारलेल्या, नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून जीवन वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असंख्य महिला आपल्या मुलांचा सांभाळ करीत आश्रमाच्या अनेक सेवा उपक्रमात नोकरी करीत आहेत. परमपूज्य शुकदास महाराजांचा विवेकानंद आश्रम या महिलांना आधार देत आहे़
एक हजार मुली घेत आहेत शिक्षण
या विवेकानंदांच्या दिव्य विचारांचा परमपूज्य शुकदास महाराजांनी घेतलेला आदर्श म्हणजे आश्रमात एक हजार मुली शिक्षण घेत असून त्यांतील ६५० ते ७०० मुली वसतिगृहात राहत आहेत. पालकांनाही आपली मुलगी आश्रमात शिकते, ती नक्कीच कर्तृत्ववान आणि चारित्र्यसंपन्न होणार आहे, हा विश्वास वाटतो. आदित्य आणि गायत्री यांसारख्या असंख्य मुलांचे मायबाप झालेला विवेकानंद आश्रम हा सदैव जनसेवक व दरिद्री नारायणाची सेवा करणाऱ्या सेवकाच्या भूमिकेत राहणार आहे, असे आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी सांगितले़