विवेकानंद जन्मोत्सव; शोभायात्रेची ५० वर्षांची परंपरा प्रथमच खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:05 PM2021-02-03T12:05:00+5:302021-02-03T12:05:46+5:30
Vivekananda Janmotsav: दरवर्षी काढण्यात येणाऱ्या शाेभायात्रेत ५० वर्षात प्रथमच काेरानामुळे खंड पडला आहे.
हिवरा आश्रम : स्वामी विवेकानंद जन्माेत्सवानिमित्त दरवर्षी काढण्यात येणाऱ्या शाेभायात्रेत ५० वर्षात प्रथमच काेरानामुळे खंड पडला आहे. यावर्षी काेराेनामुळे शाेभायात्रा रद्द करण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंद यांची भव्य प्रतिमा व शुकदास महाराज यांची भव्य प्रतिमा आरूढ असलेल्या रथाची शोभायात्रा निघत असते. यावर्षी कोरोनामुळे विवेकानंद जन्मोत्सवाच्या ५० व्या अभूतपूर्व शोभायात्रेत खंड पडला आहे.
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, शुकदास महाराज यांच्या नामघोषाने विवेकानंद नगरी दुमदुमून जात असे. त्यामुळे ही शोभायात्रा सामाजिक परिवर्तनाची नांदी देणारी ठरत असे. तब्बल ५१ दिंड्या आणि बॅण्डपथके आणि लेझीम पथकांच्या जल्लोषात शोभायात्रा हरिहर तीर्थावरून सुरू होऊन जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत विसावत असे. जमलेल्या हजारोंच्या गर्दीत मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडून शोभायात्रेची सांगता होत असे. मल्लखांब, शारीरिक कवायती, महिला भजनी मंडळांनी धरलेला हरिनामाचा फेर, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे विवेकानंद नगरी दुमदुमत असे. यानिमित्त महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने भावभक्तीला उधाण येत असे. विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते शुकदास महाराज व स्वामी विवेकानंदांच्या रथारूढ मूर्तीचे पूजन शंखनिनादात होत असे. मात्र यावर्षी शाेभायात्रा रद्द करण्यात आल्याने शुकशुकाट हाेता.