१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र
By दिनेश पठाडे | Published: April 23, 2024 06:48 PM2024-04-23T18:48:41+5:302024-04-23T18:49:55+5:30
या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पाठवले आहे.
बुलडाणा : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे बुलढाणा मतदारसंघातील १७ लाख ८२ हजार मतदारांना व्होटर स्लीपचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पाठवले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी १७ लाख ८२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार १०४ ठिकाणी १ हजार ९६२ मतदान केंद्र राहणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ११ हजार ५९२ अधिकारी कर्मचारी कार्यरत असतील.
तसेच ५ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी असलेल्या व्होटर स्लीपचे देखील वाटप पूर्ण झाले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मतदान करण्याबाबतचे आवाहनपर संदेशपत्रक वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.