मतदानोत्सव सुरू

By admin | Published: September 13, 2014 12:36 AM2014-09-13T00:36:36+5:302014-09-13T00:36:47+5:30

बुलडाणा जिल्हाधिकारी : आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कारवाई

Voting Festival | मतदानोत्सव सुरू

मतदानोत्सव सुरू

Next

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, याबाबत निवडणूक आयोगाची यंत्रणा सतर्क झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास, याबाबत तक्रार आल्यास संबंधिताविरुद्ध तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुरुंदकर पुढे म्हणाले की, निवडणूक प्रचार काळात वाहनांचा तसेच प्रसारमाध्यमांचा होत असलेला वापर यावर आयोगाचे बारीक लक्ष राहणार असून, प्रचार साहित्य, सभा, रॅली, बॅनर याबाबत आयोगाच्या परवानगीची गरज भासणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर तहसीलदारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना मदतीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आल्याने जवळपास २७ हजारापेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी निवडणुकीची अधिसूचना २0 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

**२७ हजार मतदार वाढले

मतदार नोंदणीसाठी निवडणूक विभागाने सातत्याने जनजागृती केली. त्यामुळेच २७ हजार ९१९ मतदार वाढले असून, सर्वाधिक ५ हजार ३९९ मतदार हे खामगाव मतदारसंघामध्ये वाढले आहेत. तर सर्वात कमी २ हजार ५0१ मतदार जळगाव जामोदमध्ये वाढले.

** १८ लाख मतदार

गेल्या विधानसभेत १८ लाख ३९ हजार ३१४ एवढे मतदार होते. यावेळी ७ मतदारसंघ मिळून १८ लाख ६७ हजार २३३ मतदार जिल्ह्यातील ७ आमदार निवडणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक विभाग जनजागृती करत आहे.

** आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेल्या सातही आमदारांची राजकीय प्रतिष्ठा यावेळी पणाला लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या मोर्चेबांधणीला आता अधिक वेग येणार असून, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

** भूमिपूजन थंडावले

आचारसंहिता कधीही लागू शकते. म्हणून भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींची आचारसंहिता लागल्याने या कार्यक्रमापासून सुटका झाली आहे. आजपासून हे सर्व कार्यक्रम थांबले आहेत. आता राजकीय प्रचाराची औपचारिकता सुरू झाली आहे.

Web Title: Voting Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.