व्हीएसटीएफ, युनिसेफची विशेष मोहिम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 03:38 PM2019-11-24T15:38:44+5:302019-11-24T15:39:22+5:30
बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठाण आणि संयुक्त राष्ट्राचा बाल आपत्ती निधी (युनिसेफ शाखा, भारत) यांच्या वतीने बालहक्क रक्षणाचे उदिष्ट घेवून सुरू करण्यात आलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा आता २८ नोव्हेंबर रोजी समारोप होत असून तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मोहिम १४ नोव्हेंबरला सुरू झाली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अनुषंगीक विषयान्वये जनजागृती करण्यात येऊन शाळांमधील मुलांच्या गैरहजेरीचा आढावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात आले. सोबतच गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसदर्भात माहिती घेऊन माहिती संकलीत करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात बालविवाहाची अनिष्ठप्रथा रोखण्यासाठी ग्रामपातळीवर उपाययोजना करण्यासोबतच अशा घटनांची प्रशासनाला कशी माहिती द्यावी, याबाबत प्रशिक्षणही दिल्या जात आहे.
योजनेचा पहिला टप्पा १५ आॅगस्टला सुरू झाला होता. दरम्यान, बचतगट कार्यकर्त्यांशीही बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली आहे. या प्रक्रियेत युनिसेफचे अधिकारीही सहभागी झालेले असून ग्रामस्थांना ते माहिती देत आहेत.
(प्रतिनिधी)