बाेगस कामगार दाखवून लाखो रुपयांची काढली मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:11+5:302021-08-12T04:39:11+5:30
इसोली : चिखली तालुक्यामध्ये काही ठराविक ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. परंतु ठराविक महिन्यांमध्येच मजूर ...
इसोली : चिखली तालुक्यामध्ये काही ठराविक ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. परंतु ठराविक महिन्यांमध्येच मजूर कामाला दिसतात. तर वृक्ष लागवड व कामावर वयोवृद्ध व लहान मुलांना कामावर दाखवून त्यांच्या जॉब कार्डवर लाखो रुपये मजुरी काढल्याचे तक्रार इसोली येथील ज्ञानेश्वर पचांगे यांनी सामाजिक वनीकरण वनविभाग अमरावती व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना यांना दिलेल्या तक्रारीनुसार २२ जानेवारी रोजी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात सात दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे सामाजिक वनिकरण चिखली कार्यालयाला सूचित केले होते. परंतु उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) यांनी दिलेल्या आदेशानुसार चिखली येथील सामाजिक वनिकरण विभागाने या आदेशाला केराची टोपली दाखवली. तेव्हा तक्रारकर्त्यांने अमरावती येथील सामाजिक वनिकरण विभागाच्या वनरक्षक यांच्याकडे वरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी व रोजगार हमी योजनेच्या योजनेच्या वृक्ष लागवड व झाडांचे संगोपन करण्यासाठी या विभागांमध्ये काम असेल त्या विभागाच्या लगत असलेल्या गावातील मजुरांना काम न देता बाहेरील गावातील मजुरांना हजेरी पत्रकावर दाखवण्यात आल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे़ अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार या मजुरांच्या जॉबकार्डवर लाखो रुपये मजुरी दाखवून वृक्ष लागवड कामांमध्ये अनियमितता करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार हा वनिकरण विभागाचे वनरक्षक व चिखली सामाजिक वनिकरण यांच्या संगनमताने झाल्याची तक्रार ज्ञानेश्वर पचांगे यांनी अमरावती येथील वनरक्षक व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून वृक्षलागवड योजनेमध्ये होत असलेला गैरव्यवहार थांबावा अशी मागणी केली आहे.