वाहधारकांकडे साडेचार काेटींचा दंड थकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:49+5:302021-09-19T04:35:49+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांनी दंड न भरल्याने जिल्ह्याची थकबाकी तब्बल साडेचार काेटींवर पाेहोचली आहे. ...
संदीप वानखडे
बुलडाणा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांनी दंड न भरल्याने जिल्ह्याची थकबाकी तब्बल साडेचार काेटींवर पाेहोचली आहे. मे २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत १ लाख ८९ हजार ८६० प्रकरणात हा दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची थकलेली रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जिल्हाभरात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान विशेष माेहीम राबवण्यात येणार आहे.
गत काही वर्षांपासून वाहतूक शाखा तंत्रज्ञानाचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. अनेकवेळा वाहनचालकांकडे दंडाची रक्कम नसल्याने ती अनपेड राहते. ही रक्कम गत काही वर्षांत माेठ्या प्रमाणात वाढली आहे. मे २०१९ पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने १ लाख ८९ हजार ८६० प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ४ काेटी ४३ लाख ६९ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम वाहनचालकांकडे थकीत आहे. ही थकीत असलेली दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान विशेष माेहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने ही माेहीम राबवण्यात येणार आहे.
दंड असलेली वाहनांची खरेदी-विक्री
दंडाची रक्कम माेठी असल्याने वाहनांवर दंड लावण्यात येताे़. या वाहनांची खरेदी केल्यास ताे दंड खरेदी करणाऱ्यास भरावा लागताे. त्यामुळे वाहने खरेदी करताना त्यावर किती रुपयांचा दंड आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे.
आरटीओंनाही दिसताे वाहनांवरील दंड
विविध कामांसाठी आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनांवरील दंड तेथील अधिकाऱ्यांना दिसतो; परंतु काही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने दंडाची रक्कम वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाचा माेठ्या प्रमाणात असलेला महसूल वाहनधारकांकडे थकल्याने शासनाने आरटीओंनाही हा दंड वसूल करण्याचे आदेश देण्याची गरज आहे.
वेग मर्यादेचे सर्वाधिक उल्लंघन
विविध वाहतूक नियमांपैकी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याची सर्वाधिक प्रकरणे आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड आहे, तसेच रिफ्लेक्टर न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, धाेकादायक वाहन चालवणे आदींसाठी प्रत्येकी एक हजार रुपये, वाहन चालवण्याचा परवाना नसणे ५००, वाहनांचा विमा न काढणे २००० रुपये आणि वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसणे एक हजार रुपयांचा दंड करण्यात येताे़.
काेट
जिल्ह्यात अनेक वाहनचालकांकडे दंडाची रक्कम थकीत आहेत. ही थकबाकी जवळपास साडेचार काेटीपर्यंत पाेहोचली आहे. त्यामुळे,दंड झालेल्या वाहनचालकांनी दंडाची रक्कम त्वरित भरावी़, तसेच ही थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्ह्यात विशेष माेहीम राबवण्यात येणार आहे.
शांतीकुमार पाटील,
प्रभारी पाेलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बुलडाणा.