वैनगंंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देणार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:02 AM2021-02-09T05:02:39+5:302021-02-09T05:03:00+5:30

६० टीएमसी पाण्याचा मूळ प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे

Wainganga-Nalganga river confluence project will be accelerated says Jayant Patil | वैनगंंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देणार - जयंत पाटील

वैनगंंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देणार - जयंत पाटील

googlenewsNext

बुलडाणा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो एकदा कागदावर मंजूर झाला की, त्याचे पाणी विदर्भात कशा पद्धतीने खेळवायचे, हे आपल्या हातात आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांतर्गत ६० टीएमसी पाणी आणणे आणि विदर्भातील जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाटप होणे हा जो मूळ प्रस्ताव आहे, तो मंजूर होणे आवश्यक आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

 या प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीही त्यास जोडल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांसह वाशिम, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीही त्यासाठी आग्रही आहे. त्यासंदर्भाने पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी प्रस्तुत स्पष्टाकरण दिले. मुख्यत्वे ६० टीएमसी पाणी आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चितच आपण एका चांगल्या निष्कर्षाप्रत येऊ, असेही ते पुढे म्हणाले.

सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी बैठका
अमरावती विभागातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी मधल्या काळात फारसे यश आले नाही. त्यात अडचणी आल्यात. तो दूर करण्यासाठी सध्या जिल्हानिहाय आपण बैठका घेत आहोत. विभागातील प्रकल्पांच्या कामांना गती यावी, हा आढावा बैठकांचा मूळ उद्देश आहे. सोबतच अडचणी दूर होऊन उपलब्ध निधी खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचेही ते म्हणाले.

जिगावसाठी केंद्राच्या निधीची प्रतीक्षा
जिगाव प्रकल्पाच्या कामालाही गती देणार असून, जिगाव प्रकल्प पूर्णत्वाच्या दृष्टीने केंद्राकडून उपलब्ध होणार जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी मधल्या दोन वर्षांत उपलब्ध झाला नाही. तो येत्या काळात मिळेल, अशी आशा आहे. यासोबतच पुनर्वसन व भूसंपादनाचे काही जटिल प्रश्न मार्गी लावून येत्या काळात किमान सात टीएमसी पाणी जिगाव प्रकल्पात साठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title: Wainganga-Nalganga river confluence project will be accelerated says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.