युतीसाठी ‘वेट अँन्ड वॉच’!
By admin | Published: October 27, 2016 03:30 AM2016-10-27T03:30:05+5:302016-10-27T03:30:05+5:30
निर्णयाला विलंब; २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची अखेरची तारीख
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. २६- नगरपालिका निवडणुकीत शिवसेना - भाजप व काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती व आघाडी होईल की नाही, याची उत्सुकता सवार्ंना लागली असली, तरी पक्षाच्या नेत्यांनी मात्र ह्यवेट अँन्ड वॉचह्णची भूमिका घेतली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, तोपर्यंत निर्णय होण्याची शक्यता धूसर दिसत आहे.
नगरपालिका निवडणुकीत युती व आघाडी करण्यासाठी शिवसेना - भाज प व काँग्रेस- राकाँचे नेते तयार असले, तरी निर्णय का घेतल्या जात नाही, याचे कोडे निर्माण झाले आहे. अर्ज भरण्याचा तिसरा दिवसही संपला असला, तरी अद्याप युती व आघाडीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युतीबाबत बोलताना खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले, की भाजपशी युती करण्यास आम्ही तयार आहोत. शिवसेनेच्यावतीने तशाप्रकारचा प्रस्ताव भाजपकडे पाठविण्यात आला असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनीही आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक आहोत, आम्ही नाही म्हटलेच नाही. स्थानिक पातळीनुसार युती करण्यास भाजप इच्छुक आहे, असे धृपदराव सावळे यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचे नेते युती करण्यास तयार आहेत, तर मग निर्णयाला विलंब का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकाची उमेदवारी मिळविण्याकरिता सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
तसेच काही उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारालाही प्रारंभ केला आहे. मात्र, अद्याप युती व आघाडीचे ठरले नसल्यामुळे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी संभ्रमात आहेत.