१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, दररोजचे १५० कॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:58 AM2021-04-22T11:58:10+5:302021-04-22T11:58:46+5:30
Waiting for 108 ambulance : शहरी तथा ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेसाठी दररोजचे १५० च्या आसपास कॉल्स येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आता रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याउपरही जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ११ हजार १२१ रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचे दिव्य १०८ रुग्णवाहिकेने पार पाडले आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरावरून डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये तथा खासगी किवीड रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णांना दाखल करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शहरी तथा ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेसाठी दररोजचे १५० च्या आसपास कॉल्स येत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील जवळपास ४६ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. वर्तमान स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या ५५ हजारांच्या घरात गेली असून सक्रिय रुग्णांची संख्या ७,५०० च्या टप्प्यात आली आहे. त्या तुलनेत रुग्णालयात उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड कन्फर्म झाल्याशिवाय रुग्णांना घेण्यास जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनाही अडचण भेडसावत आहे. रुग्णवाहिकेसाठी शहरी तथा ग्रामीण भागातून दररोजचे १५० कॉल्स येतात. यातील ८० टक्के कॉल्स हे तालुकास्तरावरून असतात. ग्रामीण भागातून २० टक्के कॉल्स येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाव्यतिरिक्तही अन्य रुग्णांनाही सेवा द्यावी लागत असल्याने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचेही शेड्युलही सध्या टाइट झाले आहे. त्यातच जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या ही २३ असून या संपूर्ण रुग्णावाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ५ कार्डियाक रुग्णवाहिकाही आहेत. मध्यंतरी रूग्णवाहिकांना प्राणवायुबाबत अडचण आली हाेती. मात्र ती आता दूर झाली आहे.