विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा
By admin | Published: April 6, 2016 12:37 AM2016-04-06T00:37:25+5:302016-04-06T00:37:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना दुष्काळापासून दिलासा नाहीच; अनुदानासाठी हेलपाटे.
बुलडाणा : पावसाची अनियमितता, त्यातून निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. दुष्काळाच्या या दृष्टचक्रातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकर्यांसाठी नवीन विहिरी, विहीर पुनर्भरण, सिंचन विहिरी, विहीर दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. शेतकर्यांना विविध योजनांसाठी विहिरी मंजूर केल्या असल्या, तरी विहीर खोदण्यासाठीच्या अनुदानाकरिता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये शासनाने विहिरीवर अधिक भर दिला आहे. शेतात विहीर असली तर शेतकरी एक पीक शिल्लक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विहिरीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध योजनेच्या सुमारे १0 हजार विहिरीेचे वाटप करण्यात आले असून, कोट्यवधी रुपये या विहिरीवर खर्च होणार आहेत. धडक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात २५00 विहिरी, नरेगाच्या ७८0 विहिरी तर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तब्बल २९00 विहिरीचे टार्गेट ठेवले आहे. यावर सुमारे ७७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. विहिरीचे वाटप झाले. अनेक शेतकर्यांनी विहिरीचे खोदकाम केले, बांधकामही पूर्ण केले; मात्र आता अनुदानासाठी शे तकर्यांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. धडक सिंचन योजनेच्या विहिरीची किंमत २ लाख ५0 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. शेतकर्यांना आधी खोदकाम करावे लागते. पहिल्या हप्त्यात झालेल्या खोदकामाचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाते; मात्र कामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही. निधी उ पलब्ध असताना आणि त्रुट्या नसताना लाभार्थ्यांची जिल्हाभर अनुदानासाठी ससेहोलपट सुरू असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात नरेगाच्या जवळपास ७00 विहिरी मंजूर झाल्या असून, या विहिरींचा पैसा मजुरांच्या खात्यात जमा होतो. कामाच्या प्रग तीनुसार दर आठवड्याला झालेल्या कामाचा अहवाल तयार होतो. अहवालानुसार मजुरांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत; मात्र अनेकवेळा तसे होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी विहिरीची कामे थंडबस् त्यात पडून आहेत.
३६ हजार मजुरांची उपस्थिती
संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केल्यामुळे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर दुष्काळी कामे सुरू झाली आहेत. ३१ मार्च अखेर जिल्ह्यात ८१0 कामे सुरू होती. या कामावर ३६ हजार २४६ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीची कामे ४३९ असून, ग्रामपंचायतीच्या कामावर २२ हजार २७0 मजूर आहेत, तर विविध यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे ३७१ असून, या कामांवर १३ हजार ९७६ मजूर काम करीत आहेत. एप्रिल व मे महिन्यात कामाची संख्या वाढणार असून, मजुरांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती रोहयोचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे यांनी दिली. दरम्यान, मार्चच्या सरत्या आठवड्यात ४३ ग्रामपंचायतमधील कामे पूर्ण करण्यात आली.