शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

By Admin | Published: May 25, 2017 01:53 AM2017-05-25T01:53:53+5:302017-05-25T01:53:53+5:30

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

Waiting for the farmers! | शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या तूर खरेदीचे चुकारे अद्यापही न झाल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागत तथा बी-बियाणे व खते खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाचे स्वप्न अंधकारमय दिसत आहे. या तालुक्यातील १५९३ शेतकऱ्यांनी २३ मे पर्यंत ३४ हजार ५५९.७१ क्विंटल तूर शासनाला दिली आहे. ज्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत.
जळगाव जामोद येथील तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या खरेदीसह एकूण ६७ हजार ५५६.२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामधील एफसीआयमार्फत केंद्र शासनाने खरेदी केलेल्या ३३०९६.५१ क्विंटल तुरीचे चुकारे खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. सदर तूर खरेदी ११ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाची तूर खरेदी सुरू झाली. त्या माध्यमातून २१ मे पर्यंत २८९३७.२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा २२ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ५५२२.४८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे २२ एप्रिलपासून, तर २३ मे पर्यंत तब्बल ३८५५९.७१ क्विंटल तूर खरेदी या केंद्रावर झाली. सदर खरेदी १५९३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
शासनाने ठरवून दिलेल्या ५०५० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाप्रमाणे जवळपास १७.५० कोटी रुपये तूर उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामाची तयारी करताना पेरणीपूर्व मशागत व रासायनिक खते बी-बियाणे कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तुरीच्या चुकाऱ्याला अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही.
सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये समितीमार्फत टोकन देऊन शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे, तर मोजणीनंतर सदर तूर ही शासनाने ठरवून दिलेल्या धुळे आणि चाळीसगाव येथील वेअर हाऊसला पोच करणे आणि त्या ठिकाणी मालाची नोंद करून पावती आणण्याचे काम स्थानिक खरेदी विक्री संघामार्फत केले जाते. सदर पावत्या डीएमओ म्हणजे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविल्या जातात आणि डीएमओ मार्फत सदर पावत्या मुंबईला पाठविण्यात येतात.
या प्रक्रियेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे माप झालेल्या शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे तत्काळ मिळणे आवश्यक झाले आहे.

अद्यापही २४०० शेतकरी तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
तूर मोजणी केंद्रावर आतापर्यंत २४०० शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये २२ ते २३ मे अशा दोन दिवसांत केवळ २६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप करण्यात आले आहे, तर उर्वरित शेतकरी मापाच्या प्रतिक्षेत आहेत. तूर खरेदीची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत असून, तोपर्यंत मोजमाप होण्याची चिन्ह दिसत नसल्याने ती मुदतही शासनाला वाढवावी लागणार आहे. मात्र, त्यात पावसाने घाई केल्यास शेतकरी पूर्णत: खचून जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.

Web Title: Waiting for the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.