जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:13+5:302021-06-17T04:24:13+5:30
बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९ टक्केच (६७.४ मिमी) ...
बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९ टक्केच (६७.४ मिमी) पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १६ जूनपर्यंत जिल्ह्यात १६ टक्के (११९.४ मिमी) पाऊस पडला होता. त्यामुळे पेरण्या होण्यास पूरक वातावरण झाले होते. तशी स्थिती वर्तमान स्थितीत जिल्ह्यात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात मेहकर, चिखली, खामगाव आणि संग्रामपूर या तालुक्यात तुलनेने पाऊस चांगला पडला आहे. परिणामी, या भागात काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत.
--१७,४४३ हेक्टरवर पेरणी--
जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरवर खरीप पीक पेरण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वर्तमान स्थितीत १७ हजार ४४३ हेक्टवर पेरणी झाली आहे. एकूण उद्दिष्टाच्या ती जवळपास २.५० टक्के आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर पेरणीस प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे. तेलबियांचे प्रमाण यात अधिक ५ हजार २६० हेक्टरवर त्याचा पेरा झालेला आहे.
--२० व २१ जूनला पावसाची शक्यता--
जिल्ह्यात १९ ते १९ जूनच्या दरम्यान जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, २० ते २१ जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली असल्याचे कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी हवामानाचा सुधारीत अंदाज स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
--अेाल पाहूनच पेरणी करावी--
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडल्यानंतर किंवा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर, जमिनीत एक फुटाच्या खाली ओल गेली असल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्लाही कृषी हवामान केंद्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
--जिल्ह्यातील एकूण पेरणी--
पीक उद्दिष्ट प्रत्यक्ष पेरणी
तृणधान्य ३५,९१०.६७ ३६५.५०
कडधान्य १,१७३२१.७९ १,५३२
एकूण धान्य १,५३,२३२.४६ १,८९७
तेलबिया ४,११,८२२.४४ ५,२६०
कापूस १,६८,८८७ १०,२८५
एकूण खरीप पिके ७३४११७.२२ १७,४४२.५०